Thursday 11 April 2024

महात्मा फुले प्रखर बुद्धीवादी साहित्यिक: डॉ. रवींद्र ठाकूर

 

डॉ. रवींद्र ठाकूर

शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' वाहिनीवरुन महात्मा फुले जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान देताना ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. रवींद्र ठाकूर


कोल्हापूर, दि. ११ एप्रिल: महात्मा जोतीराव फुले हे प्रखर बुद्धीवादी लेखक, साहित्यिक होते; मात्र, त्यांचा कोणीही साहित्यिक म्हणून उल्लेख केला नाही, हे वेदनादायी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे फुले, शाहू, आंबेडकर सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज सकाळी महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने विद्यापीठाच्या शिव-वार्ता (@ShivVarta) या युट्यूब वाहिनीवरून डॉ. ठाकूर यांचे महात्मा फुले: व्यक्ती आणि वाङमय या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. ठाकूर म्हणाले, महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यात विपुल लेखन केले. अखंड काव्यरचना, तृतीय रत्नसारखे नाटक, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी यांसारखे ग्रंथ, पोवाडे अशी महत्त्वपूर्ण साहित्यनिर्मिती केली. सत्सारसारखे नियतकालिक काढून पत्रकारिताही केली. मात्र त्यांना या समाजाने साहित्यिक म्हणून मान्यता दिली नाही. ते प्रखर बुद्धीवादी होते. त्यांच्या विचारधारेत अंधश्रद्धेला थारा नाही. त्यांनी वर्णवर्चस्ववाद, जातिश्रेष्ठत्वाची मानसिकता यांविरुद्ध या बुद्धीवादाच्या बळावर रान उठविले. विद्येपासून वंचित समाजाला विद्यार्जनाचा मार्ग दाखविला. त्यांनी जसा सामाजिक विषमतेला विरोध केला, तसाच आत्माही नाकारला. त्यांनी धार्मिक कर्मकांडांपेक्षा विचारांना महत्त्व दिले.

डॉ. ठाकूर म्हणाले, इंग्रजांनी बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली म्हणून त्यांनी इंग्रजांचे कौतुक केले, तर त्यांना इंग्रजधार्जिणे ठरविण्यात आले. हिंदू धर्मातील विषमतावादी, अंधश्रद्धा पसरविणाऱ्या चालीरितींना विरोध केला, म्हणून ब्राह्मणद्वेष्टेही ठरविण्यात आले. प्रत्यक्षात फुले ना इंग्रजधार्जिणे होते, ना ब्राह्मणद्वेष्टे. ख्रिस्त, महंमद, मांग ब्राह्मणांसी। धरावे पोटाशी। बंधुपरी।। असे सांगणारे फुले हे ब्राह्मणद्वेष्टे कसे असू शकतील, असा प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केला.

महात्मा फुले यांच्या विचार व कार्याकडे अभ्यासकांचे, साहित्यिकांचे लक्ष जाऊ लागले आहे. त्यांच्या साहित्याविषयी संशोधन, लेखन होऊ लागले आहे, ही महत्त्वाची बाब असल्याचेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Wednesday 10 April 2024

डॉ. उषा इथापे थोर विदुषी: डॉ. राजन गवस

 घरंदाज सावली पुस्तकावर विद्यापीठात चर्चासत्र

शिवाजी विद्यापीठात 'घरंदाज सावली' या पुस्तकावर आयोजित चर्चासत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) गजानन साळुंखे, किसनराव कुराडे, डॉ. राजन गवस, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, सी.टी. पवार, डॉ. भारती पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे


कोल्हापूर, दि. १० एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलसचिव डॉ. उषा इथापे या केवळ इथे शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या माताच नव्हत्या, तर एक थोर विदुषी सुद्धा होत्या. त्यांचे मोठेपण विस्मृतीच्या पडद्याआडून सामोरे आणण्याचे काम डॉ. रणधीर शिंदे यांच्या घरंदाज सावली या पुस्तकाने केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. रणधीर शिंदे संपादित घरंदाज सावली- डॉ. उषा इथापे: कार्य आणि आठवणी या ग्रंथावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्या चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. गवस म्हणाले, कोणतीही संस्था ही इमारतींनी मोठी होत नसते. तिच्या उभारणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानातून ती मोठी होते. डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. उषा इथापे यांचे शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीत तशा प्रकारचे भरीव योगदान आहे. अशा व्यक्तींना जाणीवपूर्वक विस्मृतीत ढकलणे परवडणारे नसते. डॉ. इथापे यांचे कार्य अत्यंत परिश्रमपूर्वक डॉ. रणधीर शिंदे यांनी सामोरे आणले आहे. या व्यक्तीबद्दल लिहीले जात असताना त्याच्या बरोबरीने संस्थेचा इतिहासही संग्रहित झालेला आहे. डॉ. इथापे यांनी मार्गदर्शकाविना अत्यंत भरीव अशा प्रकारचे पीएच.डी. संशोधन केले. ते संशोधनही या निमित्ताने उजेडात आले. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी त्यासंदर्भात अत्यंत मौलिक स्वरुपाचे लिहीले आहे. भविष्यातील उजेडाची अर्थात संशोधनाची एक रेघ या निमित्ताने ओढली गेलेली आहे.

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, डॉ. उषा इथापे यांनी शिवाजी विद्यापीठासाठी घेतलेली अविश्रांत मेहनत न विसरता येणारी आहे. त्यांचे वात्सल्य आणि योगदान यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पहिली फळी घडली, जिने विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर केला. रणधीर शिंदे यांनी केवळ संपादकाची भूमिका न बजावता त्यापुढे जाऊन संशोधकाच्या नजरेतून पुस्तकाची मांडणी करताना अनेक बाबी सप्रमाण पुढे आणल्या आहेत, तर काही गोष्टी नव्याने प्रकाशात आणल्या आहेत.

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांनी आपल्या गतायुष्यातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. उषा इथापे आणि शिवाजी विद्यापीठ या तीन गोष्टींमुळे माझ्यासारखा एक गवंड्याचा पोर राज्याचा शिक्षण संचालक, मध्य भारतातील एका मोठ्या विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकला. येथूनच सर्वधर्मसमभावाची शिकवण घेऊन जगभर जाता येऊ शकले. माझ्यासारखे हजारो विद्यार्थी इथापे बाईसाहेबांमुळे आयुष्यात काही तरी होऊ शकले, हे त्यांचे थोर उपकार आहेत.

यावेळी गडहिंग्लजच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनीही डॉ. इथापे यांच्या अनेक आठवणी जागविल्या. त्या आम्हा गोरगरीब मुलांच्या माताजी होत्या, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला. विद्यापीठाचे माजी कर्मचारी गजानन साळुंखे यांनीही डॉ. आप्पासाहेब पवार आणि डॉ. इथापे यांनी विद्यापीठ उभारण्यासाठी घेतलेल्या कष्टांची आठवण काढताना त्यांच्यामुळेच आपले कुटुंब उभे राहू शकले, अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि कुलसचिव डॉ. उषा इथापे यांचा कार्यकाळ हा विद्यापीठाच्या पायाभरणीचा जसा होता, तसाच तो सुवर्णकाळही होता. कुलसचिव म्हणून त्यांच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी होती. त्या जबाबदारीच्या सोबतच इथल्या विद्यार्थ्यांना घडविण्याची, उभे करण्याची जबाबदारीही त्यांनी शिरावर घेतली होती. त्याचे दर्शन सदर पुस्तकाद्वारे होते. त्यांनी लावलेल्या कमवा व शिकाच्या रोपट्याला पाणी शेंदण्याचे काम काही काळ करता आले, याचे समाधान वाटते. प्रबोधिनीचे काम पुढे घेऊन जात असताना या योजनेतील पुढील फळ्यांतील विद्यार्थ्यांनाही सामावून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष प्रा. सी.टी. पवार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी शब्दशिवार प्रकाशनाचे इंद्रजीत घुले आणि मुद्रितशोधक विष्णू पावले यांचा सत्कार करण्यात आला. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक यांच्यासह डॉ. इथापे यांचे कुटुंबीय आणि डॉ. इथापे यांच्या कार्यकाळात कमवा व शिका योजनेतून शिकून बाहेर पडलेले अनेक ज्येष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फुले, शाहू, आंबेडकरांकडून देशाला समाजबदलाचा कृतीशील कार्यक्रम: सुधाकर गायकवाड

 शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे सुधाकर गायकवाड लिखित 'दलित सौंदर्यशास्त्र' ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत (डावीकडून) प्रा. श्यामसुंदर मिरजकर, डॉ. श्रीकृष्ण महाजन, श्री. गायकवाड, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. देवानंद सोनटक्के व डॉ. सचिन गरूड

शिवाजी विद्यापीठात फुले, शाहू, आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुधाकर गायकवाड.

शिवाजी विद्यापीठात फुले, शाहू, आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुधाकर गायकवाड. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


कोल्हापूर, दि. १० एप्रिल: महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या त्रयीने विषमतावादी मूल्यांना नाकारून समाजबदलासाठीचा कृतीशील कार्यक्रम देऊन समता प्रस्थापनेच्या दिशेने समाजाला नेण्याचे काम केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित फुले, शाहू, आंबेडकर सप्ताहाचे उद्घाटन आज राजर्षी शाहू सभागृहात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री. गायकवाड लिखित दलित सौंदर्यशास्त्र या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. गायकवाड म्हणाले, तत्कालीन प्रचलित समाजव्यवस्था ही विषमतेला धर्मसत्तेचा आधार देऊन तिचे समर्थन करीत होती. या मानवी वर्तन नियंत्रित करणाऱ्या विषमताधारित समाजव्यवस्थेला आव्हान देऊन नाकारण्याचे काम बुद्धानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी केले. भौतिक बदलांपेक्षा माणसाच्या माणसाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात, वर्तनात आणि निकषांत बदल करण्यासाठी त्यांनी कृतीशील कार्य केले. सामाजिक न्यायाची संकल्पना समाजाच्या मानसिक व बौद्धिक रचनेत बदल घडविण्याचा प्रयत्न करते. या न्यायाचा पुरस्कार त्यांनी केला. या चिकित्सेतूनच फुले सार्वजनिक सत्यधर्माकडे तर बाबासाहेब बुद्धाकडे वळले. शाहू महाराजांनी आपल्या राज्यसत्तेचा वापर समाजरचनेतील अधिसत्तेला आव्हान देण्यासाठी केला आणि त्याद्वारे त्यांनी लोकांना त्यांच्या सामाजिक अधिकारांचे वाटप केले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, आजच्या समाजाच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन युवकांनी काम करणे अपेक्षित आहे. ते करीत असताना फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारकार्याचा आदर्श समोर ठेवून त्यांनी वाटचाल केल्यास प्रगती होईल.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्यामध्ये स्त्री सन्मान, शेतकऱ्यांप्रती आस्था आणि शिक्षण हे समान धागे आहेत. महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना इतके ज्ञानवंत केले की त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. संस्कृतमध्ये बुधभूषणसारखा महाग्रंथ लिहीण्याइतके पांडित्य त्यांनी प्राप्त केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकरांनी महाराष्ट्रात खूप मोठी वैचारिक क्रांती डवून आणली. त्या क्रांतीला कृतीशीलतेची मोठी जोड होती. बुद्धीवादाचा वापर मानवी जीवन सुकर व सुखकर होण्यासाठी त्यांनी केला, हे त्यांच्या कार्याचे मोठे वेगळेपण ठरते. बुद्धीच्या वापराने मानवी वर्तन नियंत्रित वा अनियंत्रित होत असते. या बुद्धीचा नियंत्रित वापर सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून करणे आवश्यक आहे, ही प्रेरणा या त्रयीकडून आपणास मिळत राहते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुधाकर गायकवाड लिखित दलित सौंदर्यशास्त्र या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथावर झालेल्या चर्चेत डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. सचिन गरूड आणि प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दीपा श्रावस्ती यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. कैलास सोनवणे, उपकुलसचिव विलास सोयम यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday 5 April 2024

विज्ञानलेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना

विज्ञान परिषदेचा सुधाकर आठले पुरस्कार

 

विज्ञानलेखक तथा कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना मराठी विज्ञान परिषदेचा सुधाकर आठले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विशेष अभिनंदन पत्र प्रदान करून त्यांचा गौरव करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व डॉ. सागर डेळेकर.

कोल्हापूर, दि. ५ एप्रिल: येथील प्रसिद्ध विज्ञान लेखक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नेताजी तथा व्ही.एन. शिंदे यांना मराठी विज्ञान परिषदेकडून प्रतिष्ठेचा सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार-२०२४ जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ एप्रिल रोजी मुंबई येथे पुरस्कार प्रदान सोहळा होईल. परिषदेचे कार्यवाह प्रा. भालचंद्र भणगे यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात विज्ञान प्रसार व जागृतीच्या अनुषंगाने कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित मराठी विज्ञान परिषदेतर्फे समाजात विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता किमान दहा वर्षे विविध प्रकारे कार्य करणाऱ्या, पण ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार देऊन गौरविले जाते. सन २०२४च्या पुरस्कारासाठी डॉ. व्ही. एन. शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. रुपये २५ हजार आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. २८ एप्रिल रोजी होणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेच्या ५८व्या वर्धापन दिन कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर प्रमुख पाहुणे असतील, तर परिषदेचे अध्यक्ष डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित असतील.

डॉ. शिंदे हे गेली अनेक वर्षे विज्ञान लेखनाच्या माध्यमातून वैज्ञानिक प्रसार व जागृतीचे कार्य करीत आहेत. एककांचे मानकरी, हिरव्या बोटांचे किमयागार, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया, एककांचे इतर मानकरी आणि कृषीक्रांतीचे शिलेदार ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यासाठी डॉ. शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, इंडियन फिजिक्स असोसिएशन (पुणे) यांचा मो.वा. चिपळोणकर पुरस्कार, मिरजेच्या चैतन्य शब्दांगण संस्थेचा कै. अशोक कोरे स्मृती पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा कृ.गो. सूर्यवंशी पुरस्कार, एन्वायर्नमेंट कॉन्झर्वेशन अँड रिसर्च ऑर्गनायझेशनचा वसुंधरा पुरस्कार तसेच किर्लोस्कर समूहाचा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. शिंदे यांच्या विज्ञान प्रसार कार्याचा गौरव: कुलगुरू डॉ. शिर्के

कुलसचिव डॉ. शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी अभिनंदनाचे पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. डॉ. शिंदे गेली दहा वर्षांहून अधिक काळ आपली लेखणी, वाणी आणि प्रत्यक्ष कार्य या माध्यमातून विज्ञानविषयक जागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांचे हे वैज्ञानिक कार्य स्तुत्य स्वरुपाचे आहे. हा पुरस्कार त्यांच्या या कार्याचा गौरव आहे. शिवाजी विद्यापीठाचा परिसर ही त्यांच्या जल, वनस्पती आणि विज्ञानविषयक कार्यासाठीची प्रयोगशाळाच आहे. त्यामुळे विद्यापीठास त्यांच्या कार्याचा अभिमान आहे. यापुढील काळातही ते विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रातील प्रबोधनाचे कार्य निरंतर करीत राहतील आणि स्वतःबरोबर विद्यापीठाचे नावही उज्ज्वल करतील,’ असा विश्वास कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर उपस्थित होते.

Thursday 28 March 2024

अधिविभागांमधील संशोधकीय साहचर्य वृद्धिंगत व्हावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 

शिवाजी विद्यापीठातील विविध पेटंटप्राप्त, संशोधन प्रकल्पप्राप्त तसेच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित संशोधकांच्या गौरव प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि डॉ. सागर डेळेकर.


कोल्हापूर, दि. २८ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांमध्ये निर्माण होत असलेले संशोधकीय साहचर्य व देवाणघेवाण वृद्धिंगत होत राहावे, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजेसच्या वतीने आज विद्यापीठातील पेटंटप्राप्त तसेच प्रकल्प अनुदानप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेल्या संशोधकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधीपासूनच विद्यापीठातील विविध अधिविभागांतील संशोधकांमध्ये संशोधन सहकार्य सुरू झाले. विशेष म्हणजे विज्ञान शाखांमध्ये अंतर्गत सहकार्यवृद्धीबरोबरच सामाजिक विज्ञान शाखांशीही सहकार्य सुरू झाले. आज अशा प्रकारच्या आंतरविभागीय, आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्पांमध्ये वृद्धी होण्याची मोठी आवश्यकता आहे. त्याचबरोबर भावी पिढीमध्ये उच्चशिक्षणाविषयी ओढ जागृत व्हावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांनाही आतापासूनच विद्यापीठाशी जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठातील संशोधकांनी विषयांतर्गत तसेच आंतरविद्याशाखीय संशोधनात घेतलेली आघाडी कौतुकास्पद आहे. ती अबाधित राखण्यासाठी संशोधनात सातत्य ठेवा. आता पेटंटच्या पुढचा विचार करताना त्याचे तंत्रज्ञानात अथवा वाणिज्यिक उपयोजनात रुपांतर करता येऊ शकेल का, या दृष्टीने विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी डॉ. महाजन यांनी कुलगुरू व प्र-कुलगुरू हे दोघेही संशोधनकार्य करणाऱ्यांना सातत्याने उभारी देण्याचे काम करतात आणि त्यांचे मार्गदर्शन उत्तम नेतृत्वाचे उदाहरण असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. राहुल माने, डॉ. के.डी. कुचे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. एम.के. भानारकर, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. संतोष सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते डॉ. राहुल माने, डॉ. किशोर खोत, डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. संतोष शिंदे, डॉ. कबीर खराडे, प्रमोद कोयले (सर्व पेटंटधारक), डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. एस.ए. संकपाळ, डॉ. के.डी. कुचे (सर्व विविध संशोधन प्रकल्पधारक), डॉ. सुनील गायकवाड, अक्षय खांडेकर, डॉ. डोंगळे, डॉ. संतोष सुतार, डॉ. क्रांतीवीर मोरे आणि डॉ. पद्मा दांडगे (आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित शोधनिबंधांचे लेखक) यांचा ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. डॉ. डेळेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आणि आभार मानले.

गायत्री गोखलेला पेटंटदूत पत्र प्रदान

 विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाची बी.टे. तृतीय वर्षात शिकणारी पेटंटधारक विद्यार्थिनी गायत्री गोखले हिला विद्यापीठाची पेटंट सदिच्छादूत बनवावे, अशी सूचना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गेल्या बैठकीमध्ये केली होती. त्यानुसार तिला आज कुलगुरूंच्या हस्ते पेटंटदूत म्हणून पत्र प्रदान करण्यात आले. विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी तिने संवाद साधून त्यांना संशोधनासाठी प्रेरित करावे, अशी अपेक्षा कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केली.

 

शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या जडणघडणीत

डॉ. प्रतिभा पाटणकर यांचे योगदान मोलाचे: डॉ. महाजन

शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातर्फे डॉ. प्रतिभा पाटणकर यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पाटणकर यांना मानपत्र प्रदान करून गौरव करताना अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन. सोबत (डावीकडून) डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. एस.बी. पाटणकर, डॉ. चेतना सोनकांबळे व डॉ. रुपाली संकपाळ.


 

कोल्हापूर,२८ मार्च: डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. पाटणकर येत्या ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने अधिविभागाच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आज आयोजित करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते.

डॉ. महाजन म्हणाले, डॉ. पाटणकर यांनी शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी विविध महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांत शिक्षण म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने गुरु घडविणाऱ्या गुरु आहेत. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केलेले कार्य अशा व्यक्तिमत्त्वामुळे सार्थ झालेले दिसते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

डॉ. पाटणकर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, अधिविभाग हे माझे जणू दुसरे घरच बनले होते, इतकी मी त्याच्याशी एकरुप झाले. विद्यार्थ्यांनी अध्ययन आणि संशोधन या दोन गोष्टी सातत्याने करण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अधिविभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी डॉ. पाटणकर यांच्या योगदानाविषयी मनोगते व्यक्त केली. यामध्ये डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. एम.के. भानारकर, डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. विद्यानंद खंडागळे, सुहाना नायकवडी, प्राची पाटील, अतुल जाधव, स्मिता पाटील, सरस्वती कांबळे, आरती पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमास अॅड. डॉ. एस.बी. पाटणकर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय, डॉ. निलिमा सप्रे, डॉ. के.बी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. प्रतिभा पाटणकर यांच्या जीवनावरील तीन मिनिटांची ध्वनी-चित्रफित दाखविण्यात आली. डॉ. महाजन यांच्या हस्ते डॉ. प्रतिभा पाटणकर यांचा मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. डॉ. सोनकांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले. शिस्त, निष्ठा आणि समर्पण ही जीवनाची त्रिसूत्री असणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. प्रतिभा पाटणकर असा गौरव मानपत्रात करण्यात आला. डॉ. खंडागळे यांनी आभार मानले.


शिवाजी विद्यापीठाच्या ऊर्जा साठवणूकविषयक उपकरणाच्या संशोधनास दोन पेटंट

 डॉ. सागर डेळेकर, स्वप्नजीत मुळीक यांचे संशोधन

 

डॉ. सागर डेळेकर


स्वप्नजीत मुळीक





कोल्हापूर, दि. २८ मार्च: नॅनो संमिश्रांवर आधारित ऊर्जा साठवणूकविषयक उपकरण निर्मितीच्या महत्त्वपूर्ण संशोधनास जर्मन आणि भारतीय अशी दोन पेटंट नुकतीच प्राप्त झाली आहेत. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. सागर डेळेकर आणि स्वप्नजीत मुळीक यांनी या संदर्भातील संशोधन केले आहे.

नॅनो संमिश्रांवर आधारित मटेरियलपासून तयार केलेल्या कॅथोडद्वारे सुपर कॅपॅसिटरची क्षमता वाढवण्यासाठीचे हे संशोधन आहे. सुपरकॅपॅसिटरच्या उपकरणासाठी निकेल कोबाल्टाइट, कोबाल्ट ऑक्साईड आणि पोरस कार्बनचा वापर करण्यात आला आहे. या नॅनो संमिश्रामुळे सदर उपकरणाची कार्यक्षमता विकसित होणार असून या संशोधनाद्वारे ऊर्जा क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडून येईल. जगाची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे ऊर्जेवरील वाढता ताण लक्षात घेता हे संशोधन ऊर्जा क्षेत्राला नवीन दिशा देणारे ठरेल.

हे उपकरण स्वच्छ, कमी र्चि स्वरूपाचे असून पारंपरिक ऊर्जेच्या वापराऐवजी हे नवीन उपकरण ऊर्जा संवर्धनासाठी नक्कीच प्रभावशाली ठरणार आहे. सदर संशोधनाचा लाभ ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधकांसह समाजातील ऊर्जेच्या समस्यांवर उपाय म्हणूनही होणार आहे. या संशोधनामुळे तयार करण्यात येणारी उपकरणे ही सध्याच्या ऊर्जेची गरज लक्षात घेता ऊर्जा क्षेत्रासाठी अनमोल देणगी देणारी ठरतील, असा विश्वास डॉ. डेळेकर यांनी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल डॉ. सागर डेळेकर स्वप्नजीत मुळीक यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले.