Friday, 5 December 2025

‘खेलो इंडिया’मध्ये शिवाजी विद्यापीठाला ४ सुवर्णांसह २० पदके

अॅथलेटिक्स, कयाकिंगमध्ये नेत्रदीपक कामगिरी

 

सुवर्णपदक विजेती प्राची देवकाते


रौप्यपदक विजेता विकास खोडके



कयाकिंगमध्ये कांस्यपदक प्राप्त करणारा शिवाजी विद्यापीठाचा पुरूष संघ

कयाकिंगमध्ये तीन कांस्यपदके प्राप्त करणारा विद्यापीठाचा महिला संघ



कोल्हापूर, दि. ५ डिसेंबर: जयपूर (राजस्थान) येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी चार सुवर्णपदकांसह एकूण वीस पदके प्राप्त केली. यामध्ये तीन रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. कयाकिंगमध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अॅथलेटिक्समध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. १०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवून ऋषी प्रसाद देसाई याने दमदार सुरवात केली, तर प्राची देवकाते हिने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक मिळवून स्पर्धेची अखेरही सुवर्णमयी केली.
अॅथलेटिक्समध्ये ११० मीटर अडथळा शर्यतीत विकास आनंदा खोडके याने १४.५१ सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक प्राप्त केले. तर, ८०० मीटर धावण्यात रिया पाटीलने कांस्यपदक प्राप्त केले.
कयाकिंग व कनोईंग प्रकारात विद्यापीठाच्या खेळाडूंनी पाच कांस्यपदके मिळविली. कनोईंगमध्ये वैयक्तिक गटात १००० मीटर सी-वन प्रकारात प्रिया मारुती चव्हाण हिने कांस्यपदक पटकावले.

कयाकिंगमध्ये विद्यापीठाच्या चमूने चार कांस्यपदके पटकावली. कयाकिंग के-फोर १००० मीटर महिला संघाने कांस्यपदक पटकावले. या संघात आरती जाधव, निकिता मगदूम, सुहाना जमादार आणि प्रणाली कोपर्डे होत्या. याच संघाने के-फोर २०० मीटर महिला गटातही कांस्यपदक मिळवले. के-फोर ५०० मीटर महिला गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या विद्यापीठाच्या संघात ऋतुजा पाटील, आरती जाधव, निकिता मगदूम व सुहाना जमादार होत्या. के-फोर २०० मीटर पुरुष गटात कांस्यपदक मिळवून देणाऱ्या संघात करण घुणके, स्वानंद अक्कीवाटे, अमेय भुयेकर आणि श्रीसमर्थ सासणे होते.

Wednesday, 3 December 2025

मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या इतिहासाचे प्रभावी चित्रण: संपत मोरे

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना संपत मोरे. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रकाश पवार, अशोक पवार आणि डॉ. नंदकुमार मोरे.


कोल्हापूर, दि. ३ डिसेंबर: मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या  इतिहासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. ते नव्या पिढीसमोर मांडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अभ्यासक संपत मोरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या जी.डी.(बापू) लाड अध्यासनाच्या वतीने जी.डी. (बापू) लाड यांच्या जयंतीनिमित्त प्रतिसरकारची चळवळ आणि मराठी साहित्यया विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार होते.

प्रतिसरकारच्‍या चळवळीचे विविध पैलू उलगडून सांगताना संपत मोरे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य अनेकांच्या त्यागातून साकारले आहे. स्वातंत्र्य चळवळीत प्रतिसरकारचे मोठे योगदान आहे. प्रतिसरकारचा जाज्ज्वल्य इतिहास मराठी साहित्यातून प्रतिबिंबित झाला आहे. मराठी साहित्यातून क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी.(बापू) लाड, नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनातील प्रसंग साहित्यातून चित्रित झाले आहेत. ना. सी. फडके, .दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, वामन होवाळ, रा. तु. पाटील यांच्या साहित्यातील तसेच कथा, शाहिरी काव्य, कादंबरी, आत्मचरित्र यामधून आलेले प्रतिसरकार चळवळीचे चित्रण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याची दखल नव्या पिढीने घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. प्रकाश पवार अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, गांधीच्या विचारसरणीचा नवा अन्वयार्थ प्रतिसरकारच्या चळवळीने लावला. या चळवळीने सामाजिक सुधारणांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्नही केला. त्याबरोबरच सांस्कृतिक परंपरेशी असणारे नाते प्रतिसरकारने कधीही तुटू दिले नाही.

अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अशोक पवार, डॉ. प्रभंजन माने, डॉ. नवनाथ गुंड, प्रा. सी.एल. रोकडे, मतिन शेख, प्राचार्य आर.एस.डुबल, प्रा. प्रताप लाड तसेच इतिहास विभाग, राज्यशास्त्र विभाग, मराठी विभागातील संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 29 November 2025

शोषणविरहित जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आवश्यकता: शारदा साठे

शिवाजी विद्यापीठात स्त्री मुक्ती परिषदेला मोठा प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्त्री मुक्ती परिषदेत बीजभाषण करताना शारदा साठे. मंचावर (डावीकडून) रेश्मा खाडे, छाया राजे, डॉ. भारती पाटील आणि अमोल केरकर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्त्री मुक्ती परिषदेत बीजभाषण करताना शारदा साठे. मंचावर (डावीकडून) डॉ. भारती पाटील आणि अमोल केरकर.

(स्त्री मुक्ती परिषदेची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: शोषणविरहित आणि मानवतापूर्ण जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आजच्या काळातही मोठी आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि महाराष्ट्र स्त्री मुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री मुक्ती चळवळीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित एकदिवसीय कोल्हापूर जिल्हा स्त्री मुक्ती परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या.

शारदा साठे म्हणाल्या, स्त्रियांच्या चळवळीमध्ये झालेले विस्कळीकरण आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले एनजीओकरण यामुळं स्त्री चळवळ नकारात्मक अर्थाने प्रभावित झाली. मात्र, स्त्रियांच्या संदर्भात विविध स्तरांवरील सुरक्षा तपासणीच्या निमित्ताने पुन्हा चळवळीमध्ये जी गतिमानता आली, तिला स्त्रियांचा जो प्रतिसाद लाभला, त्यामुळे एक नवी उभारी प्राप्त झाली. नव्या बदलत्या परिप्रेक्ष्यामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीचे पुनर्गठण करण्याच्या दिशेने यापुढील वाटचाल करावी लागणार आहे. हिंसामुक्त, शांततामय वातावरणात जगण्याच्या अधिकारासाठी स्त्रीवादी चळवळ महत्त्वाची भूमिका बजावेल. या निमित्ताने एकवटलेली स्त्रियांची ताकद आता नवीन सुंदर, समन्वयाच्या जगाच्या नवनिर्माणासाठी वापरावयाची आहे. चळवळीच्या कार्याचे विकृतीकरण टाळावयाचे असल्यास तिचे योग्य दस्तावेजीकरण करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी कोल्हापूर जिल्हा स्त्री मुक्ती परिषदेच्या समन्वयक छाया राजे म्हणाल्या, स्त्रीमुक्ती चळवळीने राज्यात एकला चलो रे पासून मिल के चलो रे असा खूप चांगला समन्वयाचा सांघिक प्रवास केला आहे. स्त्रियांच्या हक्कांसाठी वेगवेगळ्या स्तरांवर कार्यरत संघटनांना एकत्र आणण्यात गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीत आलेले यश महत्त्वाचे आहे. आता पुढील ५० वर्षांच्या वाटचालीची दिशाही आपण संघटितपणानेच ठरविली पाहिजे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला माता सावित्रीबाई फुले, शारदाबाई पवार यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रेश्मा खाडे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रीती सरदेसाई यांनी आभार मानले. यावेळी मंचावर संघटनेच्या श्रीमती अमोल केरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमास तनुजा शिपूरकर, सीमा पाटील यांच्यासह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकारी, महिला सदस्य, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

स्त्रीवादी चळवळीविषयी विविध सत्रांत चर्चा

उद्घाटन सत्रानंतर विविध सत्रे पार पडली. स्त्री-पुरूष समानतेच्या दिशेने या विषयावरील सत्रात माजी प्र-कुलगुरू डॉ. माया पंडित, डॉ. भारती पाटील यांनी सहभाग घेतला. मुंबईच्या अमोल केरकर अध्यक्षस्थानी होत्या. पुरूषभान या विषयावरील सत्रात मिलींद चव्हाण (पुणे) आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. हिंसाचार- मानसिक, सामाजिक या विषयावरील सत्रात तनुजा शिपूरकर, मयुरी आळवेकर, सुनीता पाटील यांनी सहभाग घेतला. तर, शोभा कोकीतकर (मुंबई) अध्यक्षस्थानी होत्या. सुधाकर भदरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्त्रिया व अंधश्रद्धा या विषयावरील विशेष सत्रात कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ऐसे कैसे झाले भोंदू?’ या विषयावर नाटिका, बतावणीचे सादरीकरण करण्यात आले.

Tuesday, 25 November 2025

संरक्षण क्षेत्रात भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आत्मनिर्भर: काशीनाथ देवधर

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डीआरडीओचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डीआरडीओचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डीआरडीओचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर. मंचावर (डावीकडून) डॉ. हर्षवर्धन पंडित, डॉ. प्रमोद पाटील, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. अजित कोळेकर आणि डॉ. दीप्ती कुऱ्हे

(व्याख्यानाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २५ नोव्हेंबर: संरक्षण क्षेत्रामध्ये भारत अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाने आत्मनिर्भर झाला असून आता तो आयातदार राहिलेला नसून मोठ्या प्रमाणात निर्यातदार देश बनलेला आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल, स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने मीट द सायंटिस्ट या उपक्रमांतर्गत ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात श्री. देवधर बोलत होते. विद्यापीठाच्या प्रभारी प्र—ुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या.

श्री. देवधर यांनी आपल्या भाषणात भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाटचालीचा सविस्तर आढावा घेताना त्यामध्ये संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे योगदान विषद केले. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत हा संऱक्षण क्षेत्राशी निगडित सामग्री आयात करणारा देश होता. मात्र, आता चित्र पालटले असून आज देशात संरक्षणविषयक एक लाख २७ हजार कोटी रुपये मूल्याचे उत्पादन होते. त्यामध्ये २३ हजार ६२२ कोटी रुपयांच्या निर्यातीचाही समावेश आहे. पुढील पाच वर्षांत हे उत्पादन ३ लाख कोटी रुपयांवर जाईल. निर्यातही त्याच प्रमाणात वाढेल. भूमी, वायू, जल, आकाश आणि अवकाश अशा सर्व ठिकाणी वापरावयाच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन भारत करीत असून या प्रगतीने जगाचे डोळे दिपवले असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूर हे भारताने थांबविलेले नसून जोवर दहशतवादी कृत्ये सुरू राहतील, तोवर या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याच्या भूमिकेत देश असल्याचे देवधर यांनी सांगितले. यापुढे भारतावरील कोणताही दहशतवादी हल्ला हा युद्धाची कृती समजली जाईल आणि दहशतवादी आणि दङशतीला प्रोत्साहन वा आश्रय देणारे राष्ट्र यामध्ये भेद न करता कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा पाकिस्तानला दिल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, देवधर यांनी डीआरडीओसारख्या संस्थेमध्ये अतिशय जबाबदारीच्या पदांवर संशोधक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. तेथील कामाचे अनुभव त्यांनी अतिशय उत्कृष्ट व सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितली. त्यांच्या या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशाभिमानाची ठिणगी निश्चितपणे प्रज्वलित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. प्रमोद जे. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. हर्षवर्धन पंडित यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दीप्ती कुऱ्हे यांनी आभार मानले. कार्यक्रमास स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अजित कोळेकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन सोनजे, डॉ. प्रवीणकुमार पाटील यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 18 November 2025

शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा वर्धापनदिन उत्साहात

सक्षम, विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षण हाच पर्याय: कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांचे प्रतिपादन

    शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी. शेजारी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी आणि शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि अधिकारी.


शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे व जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी. मंचावर (डावीकडून) डॉ. अजितसिंह जाधव, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डॉ. विलास शिंदे, डॉ. सुहासिनी पाटील.

शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे व जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी

अध्यक्षीय भाषण करताना प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी.


स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून देताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

१)      जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना जैव-रसायनशास्त्र अधिविभागाच्या प्राध्यापक डॉ. पद्मा बाबूलाल दांडगे. मंचावर शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील.


कै. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. विकास सुदाम मिणचेकर

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना विजय रामचंद्र पोवार

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना विनय संभाजीराव पाटील

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना कल्लाप्पा दत्तू पोटले

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना राजेंद्र लक्ष्मण बारड

महाविद्यालयीन गुणवंत प्राचार्य पुरस्कार स्वीकारताना डॉ. विठ्ठल सुबराव शिवणकर

महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. जयवंत शंकरराव इंगळे

महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना प्रकाश मारुती कांबळे

महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना दिलीप अशोक सुवासे

शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान गटातील उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार स्वीकारताना जैवतंत्रज्ञान अधिविभागाच्या प्राध्यापक तथा प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि त्यांचे सहकारी.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे गटातील उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार स्वीकारताना अर्थशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक तथा प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि त्यांचे सहकारी.


(शिवाजी विद्यापीठ ६३ वा वर्धापन दिन समारंभाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: सक्षम आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षणाला पर्याय नाही. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने गेल्या ६३ वर्षांत केलेली वाटचाल अत्यंत दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या.

विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार जीव-रसायनशास्त्र अधिविभागाच्या डॉ. पद्मा बाबूलाल दांडगे यांना, तर बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जयसिंगपूरच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयातील डॉ. विकास सदाम मिणचेकर यांना प्रदान करण्यात आला.

कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्त्व अनेक उदाहरणांसह अधोरेखित केले. ते म्हणाले, उच्चशिक्षण व्यवस्थेकडून सर्वच घटकांच्या वाढत्या अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक उदासिनतेचेही वातावरण आहे. खासगी आणि परदेशी विद्यापीठांचे आव्हानही सामोरे उभे आहे. अशा पेचातून मार्ग काढण्यासाठी अतिसूक्ष्म विश्लेषणाबरोबरच संवेदनशील आणि मूल्यवान नागरिक घडविण्याची जबाबदारी आपल्याला निभावावी लागणार आहे. बुद्धिमत्ता विकसन करणारे शिक्षण, सूक्ष्म आणि सारासार विचार करणारे आणि मूल्यांची जाण असणारे विद्यार्थी घडविणारे शिक्षण तसेच विविध कौशल्ये प्रदान करणारे शिक्षण असे विद्यार्थ्यांचे चौफेर व्यक्तीमत्त्व घडविण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे या बाबींसाठी सक्षम आहे. तथापि, त्याची अंमलबजावणी तितक्याच प्रभावी आणि सक्षम पद्धतीने करण्याची जबाबदारी शिक्षक, विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकार मंडळे या सर्वच घटकांनी स्वीकारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाची वाटचाल अनुकरणीय

महाराष्ट्राचे आराध्यदैवत, राष्ट्रपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठाची गेल्या ६३ वर्षांतील वाटचाल ही अनुकरणीय स्वरुपाची असल्याचे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी या प्रसंगी काढले. ते म्हणाले, अवघे पाच अधिविभाग, ३४ महाविद्यालये आणि १४ हजार विद्यार्थ्यांसह सुरवात केलेल्या शिवाजी विद्यापीठाने या वाटचालीत ३४ अधिविभाग, २९७ महाविद्यालये आणि अडीच लाख विद्यार्थी अशी संख्यात्मक वाटचाल करीत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक उत्थानामध्ये मोलाची भर घातली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरील नॅकचे A++ मानांकन आणि नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) आघाडीच्या ५० अकृषी राज्य विद्यापीठांत स्थान प्राप्त करून आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे. जागतिक दर्जाचे अनेक संशोधक या विद्यापीठाने देशाला दिले आहेत. त्यांच्या संशोधनाचा दबदबा सर्वदूर आहे. प्रत्येक घटकाची समर्पणशील वृत्ती आणि निष्ठा यामुळेच हे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

गती, दिशा आणि वेळ यांमधील समन्वयामुळेच प्रगती: कुलगुरू डॉ. गोसावी

आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा थोडक्यात वेध घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कुलगुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि आता कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ यांचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी लाभली. यामुळे एकाच वेळी आयुष्यात फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या नावाशी आणि कर्मभूमीशी जोडले गेल्याचा अतिशय आनंद आणि अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या वाटचालीत सातत्यपूर्ण गती राखली, ही गती योग्य वेळेत योग्य दिशेने ठेवली. या तिन्हीच्या समन्वयातून शिवाजी विद्यापीठाने आपली सर्वंकष प्रगती साधली आहे. विद्यापीठाच्या लौकिकाला पुढे घेऊन जातील, असे अनेकविध उपक्रम यशस्वीपणे राबवित आहोत. भविष्यातही नव्या युगाची आव्हाने लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ती पेलण्यास सक्षम करण्याचे उद्दिष्ट बाळगून वाटचाल सुरू आहे. भविष्य हे ज्ञान, कौशल्य, संशोधन आणि मूल्याधारित शिक्षणावर उभे आहे. शिवाजी विद्यापीठ केवळ पदवीधर नव्हे, तर विचारवंत, उद्योजक, समाजसेवक आणि राष्ट्रनिर्माते घडविण्यास कटिबद्ध आहे. विकसित भारत@२०४७या स्वप्नपूर्तीत आपला प्रत्येक विद्यार्थी सक्रिय योगदान देण्यासाठी सिद्ध असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या वेळी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

जैवतंत्रज्ञान, अर्थशास्त्र अधिविभाग ठरले उत्कृष्ट

शिवाजी विद्यापीठाने सन २०१९ पासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात येऊन हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित विभागाला पारितोषिकापोटी दहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रदान करण्यात येतो. यंदा उत्कृष्ट अधिविभागांसाठीचा पुरस्कार जैवतंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र अधिविभाग यांना देण्यात आला.

नॅक मानांकित महाविद्यालयांचा गौरव

'नॅक'चे ‘A++’, ‘A+’ आणि ‘Aमानांकन मिळविणाऱ्या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा समारंभात सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान), रामानंदनगर (जि. सांगली), मुधोजी महाविद्यालय, फलटण (जि. सातारा), श्रीमती कस्तुरबाई वालचंद कला आणि विज्ञान महाविद्यालय (सांगली) आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस (जि. सांगली) या महाविद्यालयांचा समावेश आहे.

वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: डॉ. पद्मा बाबुलाल दांडगे, जीव-रसायनशास्त्र अधिविभाग

विद्यापीठातील गुणवंत प्रशासकीय सेवक:

१. विजय रामचंद्र पोवार, अधीक्षक, कॅशबुक विभाग

२. विनय संभाजीराव पाटील, सहायक अधीक्षक, आस्थापना, पी.जी. विभाग

३. कल्लाप्पा दत्तू पोटले, हवालदार, मा. कुलगुरू कार्यालय

४. राजेंद्र लक्ष्मण बारड, प्रयोगशाळा परिचर, जीव-रसायनशास्त्र अधिवभाग

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य:

१. डॉ. विठ्ठल सुबराव शिवणकर, बळवंत महाविद्यालय, विटा, जि. सांगली

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक:

१.      डॉ. जयवंत शंकरराव इंगळे, प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर, जि. कोल्हापूर

महाविद्यालयीन गुणवंत सेवक:

१.      प्रकाश मारुती कांबळे, मुख्य लिपिक, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज

२.      दिलीप अशोक सुवारे, प्रयोगशाळा परिचर, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव, जि. सांगली

कै. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. विकास सदाम मिणचेकर, श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर

यावेळी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी पसायदान सादर केले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. राजाराम गुरव, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. अजय साळी, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.